आमदाराच्या भावाचा एकावर हल्ला, ठाण्यातून पसार

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः एका आमदाराच्या भावाने घरात घुसून एकावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न करीत घरासमोरील फॉर्च्यूनर गाडी फोडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटकही केली. मात्र काही वेळातच आरोपी ठाण्यातून पसार झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

श्यामसुंदर वसंतराव उढाण, वय-४७ वर्ष, रा. एन ४. गुरुसाहनी नगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर, असे आरोपीचे नाव आहे. याबाबत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सतीश जगन्नाथराव घाटगे वय ५२ वर्ष, समृध्दी साखर कारखाना, रा-जानकी निवास, केशव नगरी शहानुर वाडी जि. छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली. ७ जानेवारी रोजी मध्यरात्री १.१० च्या सुमारास आरोपी फिर्यादींच्या जानकी निवास, केशवनगरी, शहानुरवाडी येथे आरोपी श्यामसुंदर उढाण याने घराचे दरवाजेचे सेंटर लॉक जबरदस्तीने तोडून घरात प्रवेश केला. हातात मोठा चाकू घेवून फिर्यादीवर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीची पत्नी घरात असताना आरोपीने अश्लील शिवीगाळ करुन फिर्यादीस जिवे मारण्याचे धमक्या दिल्या. तसेच फिर्यादीच्या घरातील लाखो रुपये किंमतीचे वस्तूचे तोडफोड करुन नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या फॉरचुनर कार (क्र.एमएच २० जीवी ६३००) या गाडीची समोरची काच फोडून नुकसान केले.

आरोपी झाला पसार

माहितीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतले. मात्र आरोपी आमदाराचा भाऊ असल्याने पोलिसही दबावात आले. रात्री आरोपीला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र संधी साधून आरोपी पसार झाला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच फजिती झाली आहे.